कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील शेतकरी रावसाहेब पुंजाबा गागरे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा खून करणारा आरोपी अमोल शिंदे स्वतःवर उपचार घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून पळून गेल्याची घटना घडली होती . त्या आरोपीला रविवारी कोपरगाव तालुका पोलिसांनी अहिल्यानगर येथील एका लॉजमधून अटक करण्यात आली असून आरोपी अमोल शिंदे यास कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत देण्यासाठी चाललेल्या रावसाहेब पुंजाबा गागरे (वय ५५) या शेतकऱ्याच्या अंगावर कार घालून अमोल बळीराम शिंदे याने खून केला होता. गुरूवारी (दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेनंतर कोपरगाव तालुका पोलिसांनी अमोल शिंदेचा शोध घेतला असता तो वैजापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत होता. तेथून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे कोपरगाव पोलिसांच्या बंदोबस्तात तो उपचार घेत होता. मात्र शनिवारी तो तेथून पसार झाला होता. आरोपीस अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. याप्रसंगी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अमोल बळीराम शिंदे हा अहिल्यानगर येथील एका लॉजमध्ये असल्याची माहिती मिळाली असता त्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपले पोलिस पथक रवाना केले. या पथकाने आरोपी व त्याने गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेतली.
आरोपी अमोल शिंदे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहेत. आरोपीला पकडण्याच्या कारवाईत वैशाली मुकणे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अमर गवसने, पोलीस हवालदार मधुसूदन दहिफळे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश नवाळी, रशीद शेख, अंबादास वाघ आदी सहभागी होते. दरम्यान आरोपी पसार झाल्यानंतर त्याला १५ तासांच्या आत शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आरोपीच्या निगराणीसाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवरील कारवाई टळली आहे.