चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी - Shramik News

Breaking

Monday, October 14, 2024

चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी


 मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने घाईघाईने निर्णय घेत राज्यपालांकडे शिफारस केली. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि  प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी मिळाल्यावर घाईने राज्यपालांच्या मान्यतेसाठी फाईल पाठविण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत नियुक्तीचे आदेश काढण्यात आले नव्हते. १२ पैकी पाच जागा अद्याप ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी इच्छुकांना आशेवर झुलवत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Pages