कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एवढा भीषण होता की, हॉस्पीटलमध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाला पाणी विकत आणून द्यावे लागत होते.हि परिस्थिती आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडवील्यामुळे आता बदलली असून व कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासातून यावर्षीची व्यावसायिकांची दिवाळी देखील जोरात झाली आहे. मतदार संघातील जनतेचा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी या नात्याने आ.आशुतोष काळे यांनी विकासाची दिलेली वचने पूर्ण केली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासाचा विश्वास मतदानातून व्यक्त करा आणि आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील शिवाजी रोड येथे आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दिलीप जोशी होते. सौ.चैतालीताई काळे पुढे म्हणाल्या की,आ.आशुतोष काळे यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्यामुळे या पाच वर्षात मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकासात अमुलाग्र बदल झाला आहे. कोपरगाव शहराच्या जुन्या बाजारपेठेत पावसाळ्यात काही ठिकाणी जायचे असेल तर दूरवर पायी चिखलातून जावे लागत असे आता मात्र सर्वत्र सुंदर रस्ते झाल्यामुळे कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. मागील काही वर्षात पाणी प्रश्न व सोयी सुविधेचा अभाव असल्यामुळे खरेदीसाठी दुसऱ्या शहरात जाणाऱ्या नागरिकांचा खरेदीसाठी पुन्हा कोपरगाव शहराकडे ओघ वाढला असल्याचे यावर्षीच्या दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या प्रचंड गर्दीवरून जाणवत होते. कोपरगाव शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच सर्वच प्रमुख रस्त्यांचा विकास झाला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोपरगाव शहराचा अनेक वर्षाचा पाणी प्रश्न दिलेल्या शब्दाप्रमाणे आ.आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. पाणी प्रश्न सोडविल्यामुळे महिला भगिनींची अडचण दूर होवून व्यवसायाला देखील अधिकची चालना मिळाली असली तरी ५ नं.साठवण तलावाचे काम सुरु करण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत अनंत अडचणींचा सामना आ.आशुतोष काळे यांना करावा लागला आहे याची जाणीव आपणा सर्वांना आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासाची परतफेड करण्यासाठी विकासाचा विश्वास मतदानातून व्यक्त करून आ. आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी केले. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.