राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची केंद्र शासनाच्या 'राज्य शिखर समिती' त निवड - Shramik News

Breaking

Friday, February 28, 2025

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची केंद्र शासनाच्या 'राज्य शिखर समिती' त निवड

 


कोपरगाव : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री मान.अमितजी शहा यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 'राज्य शिखर समिती' त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली आहे.

     संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जगभरात सहकाराच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वर्षात सहकाराशी निगडित राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन, सहकारी गृहनिर्माण संस्था देखील अग्रभागी राहून हिरीरीने सहभागी होऊन राज्यातील सहकार बळकट व सक्षम बनविण्यात योगदान देत आहे.

     केंद्र शासनाने निश्चित केलेले विविध उपक्रम राज्य व जिल्हास्तरीय समितीमार्फत राबविण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते संनियंत्रण करणे. तसेच राज्य सहकार विकास समिती (SCDC) ने आयोजित केलेले विविध कार्यक्रम आणि उपक्रमावर देखरेख ठेवणे समितीस आवश्यक ती मदत व सहकार्य करणे. केंद्र स्तरावरील कार्यक्रमाबाबत योग्य तो समन्वय ठेवणे.

    आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्यासाठी संपूर्ण वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वत्र प्रसारीत करण्यासाठी सर्वसमावेशक प्रसिध्दी आराखडा (मिडीया प्लॅन) तयार करणे. सहकार क्षेत्रातील यशस्वी आणि प्रेरणादायी उपक्रमांची माहिती घेऊन त्यांची सर्व प्रकारे प्रसिद्धी करणे. तसेच राज्यातील सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच राज्याने सहकार क्षेत्रामध्ये केलेली प्रगती आणि दिलेल्या योगदानाची माहिती राज्यातील जनतेला होण्यासाठी राज्यामध्ये सहकार महोत्सव सारखे कार्यक्रम आयोजित करणे. 

     राज्यस्तरीय समितीमार्फत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत समितीस वेळोवेळी मार्गदर्शन करणे. तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा प्रत्येक महिन्यामध्ये समितीकडून घेणे. सदर अहवाल राष्ट्रीय समिती, मुख्य सचिव तथा निमंत्रक यांना सादर करणे. अशा प्रकारे विविध कामांच्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात राज्य शिखर समितीच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पार पाडणार आहे.




Pages