कोपरगावात १६ फेब्रुवारी २०२५ ला सनई चौघडे वाजत होणार शुभमंगल सावधान संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा - Shramik News

Breaking

Saturday, February 15, 2025

कोपरगावात १६ फेब्रुवारी २०२५ ला सनई चौघडे वाजत होणार शुभमंगल सावधान संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा


 

श्रमिक न्यूज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 15 फेब्रुवारी  2025

 कोपरगाव -  गोरगरीब शेतकरी व सर्वसामान्य माणसांना लग्न समारंभाचा खर्च परवडत नाही हे लक्षात घेऊन विवाहासाठी होणारा अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी व सामाजिक एकोपा राखण्यासाठी कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर सायंकाळी गोरज मुहूर्तावर हा सोहळा होणार असल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने देण्यात आली आहे.  

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दहा वर्षांपूर्वी २०१५ साली संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, कृषी, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात नि:स्वार्थीपणे अविरत सेवाकार्य करत आहे. विविध सामाजिक उपक्रम व सेवाकार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेकभैय्या कोल्हे यांनी कोरोना काळात कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान देण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सोनेवाडी येथे एमआयडीसी मंजूर करवून आणली आहे.यासह रोजगार मेळावे घेत दिशादर्शक कामाचा मार्ग अनुकरला आहे.

अतिवृष्टी, महापूर, दुष्काळासारख्या आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना अन्नधान्य, वस्त्र, वैद्यकीय व आर्थिक मदत, वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य शिबीर, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४ तास अॅम्ब्युलन्स व वैकुंठ रथ सुविधा, स्वातंत्र्यदिन, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, गणेशोत्सव, गुरुपौर्णिमा, दहीहंडी, दसरा, दिवाळी, रामनवमी अशा विविध सण-उत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी, मोफत शालेय साहित्य वाटप, यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, महिषासुर दहन, प्रत्येक श्रावणी सोमवारी गंगा गोदावरी महाआरती, ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम, तरुणांना करिअरविषयी मार्गदर्शन, किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम, जलसंधारण, प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अखंड सेवाकार्य सुरू आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानने माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या मोफत फिरत्या दवाखान्याचा हजारो रुग्ण रोज लाभ घेत आहेत.

लग्नसोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे वधूपित्याला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. कर्जबाजारी व्हावे लागते. हे लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. कुटुंब म्हणून विवाहाच्या खर्चाची सर्व जबाबदारी प्रतिष्ठान घेते. प्रतिष्ठानने स्वखर्चातून आजवर शेकडो विवाह घडवून आणले असून, ही सर्व दाम्पत्ये आज आनंदाने संसार करत आहेत. यावर्षीही संजीवनी युवा प्रतिष्ठानने १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

Pages