श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 15 फेब्रुवारी 2025
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विजेचे प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी काही सबस्टेशनची क्षमतावाढ तर काही ठिकाणी नवीन सबस्टेशनला मंजुरी मिळविल्या आहेत.यामध्ये चांदेकसारे येथील सबस्टेशनचा देखील समावेश असून त्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल आभार दौरा व समस्या निवारण कार्यक्रम आ.आशुतोष काळे यांनी हाती घेतला असून कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शनिवार (दि.१५) रोजी आयोजित आभार दौऱ्यात त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी चांदेकसारे गावातील नागरिकांचे प्रश्न व अडचणी समजून घेत हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मागील पंचवार्षिक मध्ये रस्ते, वीज, पाणी हि मुलभूत विकासाची प्रश्न बहुतांश प्रमाणात मार्गी लावली आहेत. चांदेकसारे परिसरातून जात असलेल्या झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून एन.एच.७५२ जी या सावळीविहीर फाटा-कोपरगाव या रस्त्याप्रमाणे हा रस्ता देखील व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून लवकरच यश मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. चांदेकसारे गावातील उर्वरित अंतर्गत रस्ते, श्री भैरवनाथ-जोगेश्वरी देवस्थान परिसरात शेड उभारणे, दलित वस्तीतील वीज रोहित्र उभारणे आदी कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, महावितरणच्या कनिष्ठ अभियंता श्रीम. मोजाड, मंडलाधिकारी श्रीम. कोल्हे, तलाठी माळी, ग्रामसेवक दुशिंग आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.