श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 19फेब्रुवारी 2025
कोळपेवाडी वार्ताहर :- पोहेगाव ग्रामपंचायतीच्या सत्तेची मस्ती असलेल्या स्वयंघोषित नेत्याची मस्ती आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबारात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे चांगलीच उतरली आहे. मात्र पोहेगावच्या नागरिकांना आवश्यक असणारे दाखले आकसापोटी न देण्याची या नेत्याची खोड जुनीच असल्याची खोचक टीका स्वत:ला नेते म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित नेते नितीन औताडे यांच्यावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक गंगाधर औताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, स्वत:ला स्वयंघोषित नेते म्हणवून घेणाऱ्या पोहेगाव मतदार संघाच्या या नेत्याने पोहेगावातील अनेक नागरीकांना राजकीय आकसापोटी त्रास दिला आहे. अशाच त्रासाचा बळी ठरलेल्या सौ.वैशाली किरण औताडे या महिलेला देखील जाणीवपूर्वक त्रास देतांना ग्रामविकास अधिकाऱ्यावर दबाव टाकून बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ सुरु होती. पोहेगाव ग्रामपंचायतीमध्ये चकरा मारून हि महिला अक्षरश: वैतागली होती. त्या महिलेने आ.आशुतोष काळेंच्या पंचायत समितीच्या जनता दरबारात आपली कैफियत मांडून न्याय मागितला होता. राजकीय आकसापोटी एका महिलेला त्रास दिला जातो याची चीड आल्यामुळे आ.आशुतोष काळेंनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांना याबाबत जाब विचारला व त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या गटविकास अधिकारी संदीप दळवी यांना याबाबत खुलासा विचारला असता सौ.वैशाली औताडे यांना दाखला देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांना जागेवरच ना हरकत दाखला देण्यास सांगत नागरिकांची कामे करायची नसेल राजीनामे द्या असा सल्ला दिला.त्यामुळे सौ.वैशाली औताडे यांना दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र आ.आशुतोष काळेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोहेगाव मतदार संघाच्या स्वयंघोषित नेता असलेल्या नितीन औताडे यांचा चांगलाच जळफळाट झाला.
आ. आशुतोष काळेंच्या जनता दरबारात असंख्य नागरीकांचे शासकीय कार्यालयातील प्रश्न सुटत असल्यामुळे नागरीकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आपला प्रश्न आ. आशुतोष काळेंच्या जनता दरबारातच सुटेल अशी पक्की खात्री पटलेल्या सौ.वैशाली औताडे यांनी आपली अडचण मांडली आणि आ.आशुतोष काळे यांनी ती जागेवरच सोडविली.त्याचा राग आल्यामुळे पोहेगावच्या लोकनियुक्त महिला सरपंच यांच्या नावाचा आधार घेत आपला राग या स्वयंघोषित नेत्याने व्यक्त करून अप्रत्यक्षपणे आ.आशुतोष काळे यांच्यावर टीका केली. त्याचा संचालक गंगाधर औताडे यांनी चांगलाच समाचार घेतला. आपला गावावर असलेला वचक व दबदबा कायम ठेवण्यासाठी स्वयंघोषित नेत्याला महिला सरपंचांच्या नावाचा आधार घ्यावा लागतो ज्यांना याबाबत काही माहिती नाही त्यांच्या नावाने आ. आशुतोष काळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारा हा स्वयंघोषित नेता काय योग्यतेचा आहे हे सिद्ध होत असून या स्वयंघोषित नेत्याने आपली लायकी ओळखावी अशी टीका संचालक गंगाधर औताडे यांनी नितीन औताडे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.