कोपरगाव - शिंगणापूर शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
रांजणगाव देशमुख (वार्ताहर :)पालकांनी निर्जीव संपत्तीपेक्षा आपल्या पाल्याच्या शिक्षण व संस्काराकडे लक्ष दिल्यास भावी पिढ्या संस्कारक्षम तयार होतील, असे प्रतिपादन श्री बाळासाहेब गुंजाळ सर यांनी केले.शिंगणापूर येथील प्राथमिक शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक बँकेचे संचालक श्री शशिकांत जेजुरकर सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भगवानराव संवत्सरकर श्री लक्ष्मीकांत संवत्सरकर,प्रवीणभाऊ संवत्सरकर, माणिकराव कुऱ्हे, नवनाथ संवत्सरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सावित्रीबाईंच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.यावेळी संचालक श्री.शशिकांत जेजुरकर सर यांनी आपल्या जीवनात पुस्तके व चांगले मित्र महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन केले. तसेच तज्ञ सदस्य लक्ष्मीकांत संवत्सरकर तसेच इतर सदस्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळेच्या अडचणी व समस्यांची सोडवणूक करण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी सोहम कुऱ्हे तसेच पालक माणिक कुऱ्हे व वर्गाशिक्षक किरण निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत मिळालेले शिक्षण व शालेय जीवनातील अनुभव त्यांच्यामनोगतातून व्यक्त केले. तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सिलिंग फॅन भेट दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री. अण्णासाहेब गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक श्री किरण निंबाळकर,देवराम खेमनर,सचिन आढांगळे,कैलास सोमासे तसेच श्रीमती सुनिता मोरे,विजया जाधव,राजश्री पारखे,विद्या मैड,सुषमा निकाळजे आदींनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मिसळ पावचे जेवण देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सचिन आढांगळे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री देवराम खेमनर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती विजया जाधव यांनी केले.