गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा -आ. आशुतोष काळे - Shramik News

Breaking

Tuesday, April 22, 2025

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा -आ. आशुतोष काळे


 कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात शुक्रवार (दि.१८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कमेसह लाखोंच्या घड्याळाची चोरी केली होती. घटनेची माहिती समजताच त्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून तपासाबाबत सूचना केल्या होत्या. रविवार (दि.२०) रोजी चोरीची घटना घडलेल्या सचिन वॉच कंपनी या दुकानात जावून दुकान मालक लोहाडे बंधू यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलूबुर्मे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना तपासाला गती देवून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा व लवकरात लवकर चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद करा अशा सूचना केल्या.


यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, मोठ्या शहरात होणाऱ्या धाडसी चोऱ्यांच्या घटनेप्रमाणे कोपरगावात शहरात देखील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरीच्या घटना घडू लागल्या हि चिंतेची बाब आहे. पोलीस प्रशासनाचे अपयश असून त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहीला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे  कोपरगाव शहरात पोलीस प्रशासनाचा धाक निर्माण करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारांमध्ये वचक रहील अशा पद्धतीने कोपरगाव शहरासह तालुक्यात परिस्थिती निर्माण करा. कोपरगाव शहरातील गुन्हेगारांची पाळमूळ शोधून काढून भविष्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात अशा घडणार नाहीत याची काळजी घ्या. नागरीकांना नेहमीच सुरक्षित वाटेल असे तालुक्याचे वातावरण निर्माण करा. अवैध धंद्याला लगाम लावून पोलीस गस्त वाढवा व अवैध व्यवसाय करणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो त्याची गय न करता कडक कारवाई करा अशा शब्दात आ.आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या.


यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलूबुर्मे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जिल्हा गांधी चरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, व्यापारी महासंघाचे सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages