कोपरगाव - पाकिस्तानातील नऊ ठिकाणांवर भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या अचूक आणि प्रभावी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संरक्षकांना दिलेला हा करारा जवाब आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
या निर्णायक कारवाईबद्दल त्यांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा. अमित शहा आणि संरक्षणमंत्री मा. राजनाथ सिंह यांचे विशेष अभिनंदन केले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्हीही सैन्यदलांच्या समन्वयाने आणि धाडसाने देशाच्या सुरक्षेची भक्कम ढाल उभी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, “शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या त्यागातून देश अधिक बळकट होईल.”
देशवासीयांनी असेच एकजूट राहून राष्ट्राच्या संरक्षणासाठी सजग रहावे, असे आवाहन करताना कोल्हे यांनी सांगितले की, “भारत हा लोकशाही ने भक्कम असणारा देश आहे.एकात्मतेची ताकद देशात आहे त्यामुळे या देशाकडे वाकडी नजर करणाऱ्यांना आता तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईने गेला आहे.”