मुंबई प्रतिनिधी - निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या घोषणेने राज्यातील राजकीय तापमान चांगलेच तापले आहे.राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत 222 जागांवर एकमत झाले आहे. तिन्ही पक्ष सध्या या जागांवर उमेदवार निवडीची प्रक्रिया पुढे नेणार आहे. अशात कॉंग्रेसच्या गोटातून एक माहिती समोर आली आहे.
काल काँग्रेस स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली आहे. या बैठकीत 84 जागांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 222 जागांवर चर्चा झाली आहे. या चर्चेत काँग्रेसला 84 जागा सुटल्या आहेत. तसेच बाकी राहिलेल्या जागांमधून आणखी काँग्रेसला जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 ऑक्टोबरला काँग्रेसच्या CEC बैठकीत या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंब्याची लाट असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. राज्याला एनडीएपासून वाचवण्याचा अजेंडा घेऊन एमव्हीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले की, काँग्रेसकडे सर्व जागांवर तगडे उमेदवार आहेत. लवकरच उमेदवारांची यादी काँग्रेस निवडणूक समितीकडे पाठवली जाणार आहे.
निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया ३५ दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असल्याचे विरोधकांनी सांगितले. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र विधानसभा सर्वात मोठी आहे. असे असतानाही एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत.