अकोले तालुका प्रतिनिधी - दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी महिला ओवाळताना 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' अशी मनोकामना करताना आपण प्रत्येकानेच अनुभवलं असेल. इतकंच काय, शेतकऱ्याला पर्यायी शब्द म्हणून 'बळीराजा' या शब्दाचाही वापर होतो. या बळीराजाची भव्य मिरवणूक बळीराजा गौरव महोत्सव समितीच्या वतीने आयोजी करण्यात आली होती.
बळी कोण होता?
महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या समग्र साहित्यात बळी कोण होता यावर भाष्य केलं आहे.
त्यांच्यानुसार, 'बळी हा प्रल्हादाचा पुत्र विरोजन याचा मुलगा आहे. बळीराजा हा खूप पराक्रमी होता. बळीराजाने आधी त्याच्यासोबत असलेल्या तत्कालीन अनेक लहान लहान क्षेत्रपतींना दुष्ट दंगेखोरांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं. त्यामुळे बळीराजाचं राज्य उत्तरोत्तर वाढत गेलं.'
बळीराजाचं राज्य किती मोठं होतं?
बळीराजाचं राज्य किती मोठं होतं, हे सांगताना महात्मा फुले म्हणतात, "बळीराजाच्या ताब्यात अनेक राज्यं होती. सिव्हलद्वीपाच्या आजूबाजूची अनेक बेटेही त्याच्या ताब्यात होती. तेथे बळी नावाचे एक बेटही आहे. दक्षिणेत कोल्हापूरच्या पश्चिमेला कोकण आणि मावळातील काही क्षेत्रेही बळीराजाच्या ताब्यात होती. तेथे जोतीबा नावाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तो कोल्हापुरच्या उत्तरेस रत्नागिरी नावाच्या पर्वतावर राहायचा."
"दक्षिणेत बळीराजाच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या राज्याला महाराष्ट्र असे म्हटले जायचे. या राज्यात राहणाऱ्यांना महाराष्ट्री म्हणत असतं. पुढे त्याचा अपभ्रंश मराठे असा झाला. हे महाराष्ट्र राज्य खूप मोठे असल्याने बळीराजाने त्याचे 9 खंड (भाग) केले होते. या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्यास खंडोबा नाव पडले. याशिवाय बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि 9 खंडांचा न्यायी असे दोन अधिकारी वसुली आणि न्याय करण्यासाठी नेमले होते. त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा असा झाला. तो सर्व पिकांची तपासणी करून त्याप्रमाणे सुट तुट द्यायचा आणि सर्वांना आनंदात ठेवायचा," असं महात्मा फुले सांगतात.बळीराजाच्या राज्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर होता. त्याबाबतही महात्मा फुले माहिती देतात. ते पुढे सांगतात, "अयोध्येजवळ काशीक्षेत्राच्या आजूबाजूलाचा काही भागही बळीराजाच्या ताब्यात होता. त्याला दहावा खंड म्हटलं जायचं. तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळभैरी होते. एकूण क्षेत्रपतींपैकी सात क्षेत्रपतींनी तर त्यांच्या भागाचा कारभार बळीराजाकडेच दिला होता. त्यामुळे त्यांना सात आश्रयीत असंही म्हटलं जायचं."
"बळीचे राज्य फार मोठे होते आणि तो खूप बलवान होता. म्हणूनच 'बळी तो कान पिळी' अशी म्हणही वापरात असल्याचं दिसतं. बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा, जोतीबा व 9 खंडोबा रयतेच्या सुखासाठी झटण्याची शर्थ करत असे. त्यामुळेच सर्व मऱ्हाठ्यांनी प्रत्येक शुभकार्य सुरू करण्याआधी भैरोबा (बहिरोबा), जोतीबा व खंडोबाला देव मानून तळी उचलण्याची परंपरा सुरू केली," असंही महात्मा फुले नमूद करतात.महाराष्ट्रात कोठे कोठे बळीगौरव यात्रा निघते?
पुण्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून धुळ्यातही सत्यशोधकांच्या पुढाकाराने 9 ठिकाणी बळीराजा गौरव मिरवणुका निघतात. त्यात बैलगाडा, नांगर यांचा समावेश असतो. 3 वर्षांनी अहमदनगरमध्येही ही मिरवणूक सुरू झाली. ही सुरू करण्यात अभिजीत अनाप, बहिरनाथ वाकळे यांनी पुढाकार घेतला.
पुण्यातील बळीराजा गौरव मिरवणूक झाली की मावळमध्येही अशी मिरवणूक काढली जायची. कारण शेतकरी सायंकाळी उपलब्ध असायचे. याशिवाय पुण्यातील धनकवडी येथेही अशी मिरवणूक काढली जायची.
महाराष्ट्रात धुळ्यासह जळगाव, नंदूरबार, मुंबई, ठाणे, अहमदनगर (अहिल्यानगर), संगमनेर, अकोले, लातूर, उदगीर, नागपूर, कोल्हापूर, ओतूर इत्यादी ठिकाणीही अशा मिरवणूक निघतात. अकोले तालुक्यात विजय भगत, विकास पवार यांनी बळीराजा गौरव समिती, अकोले अंतर्गत अशी मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला.
सांगलीत महिला एकत्र येऊन दिवाळीत मातीचं बळी राजाचं राज्य मांडतात. याशिवाय मातीचा राजवाडा तयार करून बळीराजा, त्याचं सैन्य आणि बाजूला शेती करणारे शेतकरी असं दाखवलं जातं. तसेच पणत्या एकत्र बांधून त्या कुटतात. यातून त्या महिला भावाच्या शत्रूला आम्ही कुटतो आहे आणि आमचा भाऊ महाबळी आहे असं प्रतिकात्मपणे सांगतात.
अशा या अनोख्या उपक्रमाचे अकोले शहरासह तालुक्यातील व जिल्हयातील नागरिकांनी कौतुक केले आहे. या मिरवणुकीत बळीराजा गौरव समितीच्या सदस्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.