कोपरगाव - शालेय जीवनात खगोलशास्त्राची ओळख ही फार महत्त्वाचे आहे. त्यातूनच उद्याचे खगोलशास्त्रज्ञ घडत असतात असे कोपरगाव तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे तारांगणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. केरळ येथील थुंबा इसरो, मुंबईचे तारांगण सेंटर, यशवंतराव चव्हाण तारांगण नाशिक येथे सर्वसामान्य मुलांना जाऊन तारांगण अवकाश पाहणे शक्य नाही, अशा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अतिशय माफक दरात यशोधन मल्टी सेल्स अँड सर्विसेस यांनी फिरते तारांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले.भास्कर वस्ती शाळेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना अतिशय माफक दरात हा उपक्रम दाखवणार असल्याचे यशोधनचे संचालक विश्वेश्वर बागले यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी कोपरगाव तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, कोपरगाव तालुका गट समन्वयक दिलीप दहिफळे यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपाध्यापक सुकलाल महाजन व महादेव प्रधान यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपाध्यापिका ज्योती टोरपे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे उपाध्यापक महेंद्र विधाते यांनी केले. तारांगणचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला असता सर्व विद्यार्थी हे खूप आनंदी व समाधानी झाले. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थ यांनी शाळेचे कौतुक केले.