कोपरगाव - कोपरगाव मतदारसंघातील रवंदे गावातील ४० आदिवासी कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती. या रहिवासी नागरिकांच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना बेघर व्हावे लागणार होते.त्यामुळे हा निर्णय दुर्देवी असल्याने आदिवासी समाजाची अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली.यामुळे एकलव्य संघटनेच्या वतीने या अन्यायाविरोधात सोमवार १७ मार्चपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू होते. २४ मार्च ही माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती प्रेरणादिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते आहे. स्व.कोल्हे यांचे मोठे काम आदिवासी समाजाच्या बद्दल होते. आदिवासी दाखले,जागा,रोजगार,घरे, उपजिविकेसाठी पशुपालन प्रकल्प असे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. आदिवासी समाजासमोर वर्तमान स्थितीत उद्भवलेला प्रश्न सुटण्यासाठी सुरू झालेली मोहीम ही त्यांच्याप्रती प्रेरणारूपी आदरांजली आहे असे चित्र बघायला मिळाले.
आदिवासी समाजाच्या जागेच्या प्रश्नाची समस्या सुटण्यासाठी मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून पुढाकार घेत आदिवासी कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे आश्वस्त केले. शासन स्तरावर आणि प्रशासनाला पाठपुरावा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान दिले. त्याच वेळी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले आणि एकमेकांना पेढे भरवत आंदोत्सव साजरा केला.
या आंदोलनात महिला, पुरुष आणि लहान मुले यांचा सात दिवसापासून उन्हात ठिय्या सुरू होता. सुरवातीला शांत असणारे हे आंदोलन दिवसेंदिवस मात्र तीव्र होत झाल्यानंतर अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली. पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जागा देण्याचा प्रस्ताव सादर करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी स्व.कोल्हे साहेब यांच्या प्रेरणादिनाचे औचित्य उल्लेखनीय ठरले आहे.आपला प्रश्न सुटून लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आदिवासी बांधवांनी स्वागत केले आहे.