समता ठेवीदार आणि कर्जदार यांचे हित जोपासते - संचालक संदीप कोयटे - Shramik News

Breaking

Sunday, March 30, 2025

समता ठेवीदार आणि कर्जदार यांचे हित जोपासते - संचालक संदीप कोयटे


 

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थितीचा अहवाल ३१ मार्चला जाहीर करण्याची परंपरा कायम  असून या आर्थिक वर्षात ३० मार्चला रविवार व गुढीपाडवा आणि ३१ मार्चला रमजान ईद निमित्त सुट्टी असल्यामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक पत्रके २९ मार्चलाच आर्थिक पत्रके जाहीर करण्यात आली आहे.

        समताच्या ठेवी ३१ मार्च २०२४ रोजी ९२४ कोटी इतक्या होत्या. त्यात १२ % इतकी वाढ होऊन ३१ मार्च २०२५ अखेर १०३५ कोटी रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत. तसेच ३१ मार्च २०२४ रोजी कर्ज वाटप ६७० कोटी रुपये होते. त्यात १८ % इतकी वाढ होऊन ३१ मार्च २०२५ रोजी कर्ज वाटप ७९६ कोटी रुपये इतके झाले आहे. याचे श्रेय समताचे सर्व सभासद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्य क्षमतेला जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समता पतसंस्था सभासदांना महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षितता प्रदान करणारी संस्था आहे. नवनवीन योजना व उपक्रमामुळे समताने ठेवीदारांबरोबरच कर्जदाराचेही हित जोपासले आहे. असा दुहेरी संगम साधणाऱ्या समता पतसंस्थेचा आम्हा संचालक मंडळाला अभिमान आहे. तसाच अभिमान सभासदांनाही असावा. असे मत संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी काढले.

       समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४ - २५ च्या आर्थिक स्थितीचा अहवाल समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आला. प्रसंगी संस्थेची आर्थिक स्थिती सादर करताना ते बोलत होते.

      ते पुढे म्हणाले की, समता पतसंस्थेची सभासद संख्या ३१ मार्च २०२५ पर्यंत तब्बल ९७ हजार ३८० इतकी आहे. समताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व व्यवहार केवळ १५ शाखांच्या माध्यमातून झालेले आहे. प्रति शाखा ठेवींचा विचार केल्यास प्रति शाखा सरासरी ६९ कोटी रुपये पर्यंत ठेवींचा आकडा जात आहे. हा महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील विक्रम आहे. तसेच ३१ मार्च २०२५ रोजी १८३१ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला संमिश्र व्यवसायात १५ टक्के वाढ झाली आहे. सहकार खात्याच्या निकषानुसार वैधानिक तरलतेची गुंतवणूक ही एकूण ठेवीशी  २५ % इतकी असावी लागते. म्हणजेच २३१ कोटी गुंतवणूक आवश्यक असताना संस्थेने २७० कोटी इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. समता लवकरच रोबोट तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना सेवा देण्यात येणार  आहे. 

       विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे. समताचे सोनेतारण कर्ज ३१ मार्च २०२४ अखेर ३५२ कोटी रुपये इतके होते, त्यात तब्बल १४८ कोटी रुपयांची वाढ होऊन ३१ मार्च २०१५ अखेर ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ६५ % इतके आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ७३ % इतके आहे. सोने तारण कर्जामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ०% रिस्क सोनेतारण कर्जात आणण्यात यश मिळविले आहे. सुधन गोल्ड लोन मुळे समताच्या अति सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या सोने तारण कर्जात ० टक्के एनपीए असून थकबाकी ही ० टक्के राखण्यात यश मिळवले आहे.

      अधिक माहिती देताना सरव्यवस्थापक सचिन भट्टड म्हणाले की, समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत समताच्या ९९.८२ % ठेवीदारांच्या ४० लाख रुपयांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच उर्वरित २४१ कोटी रुपयांचा ठेवीसाठी २६६ कोटी इतक्या रुपयांचे सुरक्षित कर्ज वाटप केले आहे.

      तसेच ३१ मार्च २०२४ ची प्रति कर्मचारी उत्पादक क्षमता ६ कोटी ४१ लाख इतकी तर ३१ मार्च २०२५ ला प्रति कर्मचारी उत्पादक क्षमता ७ कोटी १० लाख इतकी आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्मचारी उत्पादकता ०.६९ टक्क्यांनी वाढलेली आहे. समताच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अधिक वापरामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा उच्चांक देखील समताने केलेला आहे. 

      समताने ठेव, कर्ज व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापित केले आहे. कर्ज वितरण करताना समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल व क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. त्यामुळे कर्ज थकत नाही आणि ठेवी देखील सुरक्षित आहेत.

       संस्थेचे जेष्ठ संचालक जितूभाई शहा म्हणाले की,  सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्था सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात. त्यामुळे संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी राज्यातीलच नाही, तर परराज्यातील पतसंस्था ही मोठ्या प्रमाणात कामकाज पाहण्यासाठी येत असतात. समताच्या वसुलीच्या समता पॅटर्न द्वारे कर्ज वसुलीचे धोरण राबविण्यात वसुली अधिकारी जनार्दन कदम यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.

      तसेच समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्व प्रथम आणून पेपरलेस बँकिंग प्रणाली प्रत्यक्षात आणली आहे. समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिले आहे.



कोपरगावकरांनी समता पतसंस्थेच्या कोपरगाव शाखेत ३५५ कोटी रुपयांच्या ठेवी, राहाताकरांनी राहाता शाखेत १२५ कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवी तर श्रीरामपूरकरांनी श्रीरामपूर शाखेत ११४ कोटी २५  लाख रुपयांच्या ठेवी जमा करून कोपरगाव, राहता, श्रीरामपूर येथील ठेवीदारांनी समता वर जो विश्वास दाखविला त्याबद्दल कोपरगावकरांचे कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे, राहाताकरांचे राहाता शाखाधिकारी मिलिंद बनकर तर श्रीरामपूरकरांचे श्रीरामपूर शाखाधिकारी फारुख शेख  यांनी आभार मानले.


      या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक जितूभाई शहा, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, गुलशन होडे, कचरू मोकळ, निरव रावलिया आदींसह मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



Pages