अभ्यासाबरोबरच सामाजिक बांधिलकी लक्षात येऊन पर्यावरणाचे रक्षण करा-अभिनेते चिन्मय उदगीरकर सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न - Shramik News

Breaking

Sunday, March 30, 2025

अभ्यासाबरोबरच सामाजिक बांधिलकी लक्षात येऊन पर्यावरणाचे रक्षण करा-अभिनेते चिन्मय उदगीरकर सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न


 

कोळपेवाडी वार्ताहर :- आजही ग्रामीण भागाशी निसर्गाची नाळ जोडलेली आहे. काळे परिवाराला कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पासून समाजकारणाची व शिक्षण सेवेची मोठी परंपरा आहे. तुम्ही भाग्यवान असून सौ.सुशीलामाईंच्या मायेचे पांघरुण तुमच्यावर आहे.अतिशय रम्य वातावरणात मिळत असलेल्या शिक्षणाचा फायदा घ्या आणि अभ्यासाबरोबरच सामाजिक बांधिलकी लक्षात येऊन पर्यावरणाचे रक्षण करा असा मौलिक सल्ला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी दिला.


कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ या होत्या.  


ते पुढे म्हणाले की, जे चमकतात त्यांच्यावर टीका होतेच त्यावेळी ती टीका सहन करून आपले कार्य सातत्याने सुरु ठेवणे महत्वाचे असते हे महाविद्यालयीन जीवनात शिकायला मिळते. व्हाटस अॅप, फेसबुक, इंस्टाग्राम हे नवीन विद्यापीठ जन्माला आली असली तरी हि विद्यापीठ फक्त माहिती देण्याचे काम करत आहेत. माहिती हे ज्ञान नाही व हि हुशारी देखील नाही. त्यावर तुम्ही जो विचार करतात ती तुमची खरी हुशारी आहे आणि हि हुशारी तुमच्या अंतर्मनातून आली पाहिजे परंतु दुर्दैवाने असे होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शहरी भागात राहणाऱ्या युवा वर्गामध्ये मानसिक समस्यांचे प्राबल्य वाढत चालले असून हि गंभीर समस्या आहे यावर एकच उपाय आहे तो म्हणजे खेड्याकडे चला,ग्रामीण भागाकडे चला, कारण आजही ग्रामीण भागाशी निसर्गाची नाळ जोडलेली आहे.गोदावरी आईला आपण आपली आई म्हणतो.जोपर्यंत निसर्गाशी आपली नाळ भक्कम आहे सुदृढ आहे तोपर्यंत आपण सुदृढ आणि भक्कम राहणार आहे. त्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आत्तापासूनच गोदावरी आई, नदीच, पाण्याच, झाडाचं आणि पर्यावरणाचा बचाव केल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोदामाई प्रतिष्ठान कोपरगावचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, नारायण बारे, सुरेगावचे उपसरपंच दीपक कदम,शरद ढोमसे आदी मान्यवर उपस्थित होते.अहवाल वाचन कार्याध्यक्ष प्रा.विनोद मैंद यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.उमाकांत कदम यांनी केले. सूत्रसंचालन, प्रा.सागर मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Pages