कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी ज्या ठिकाणाहून वीजपुरवठा करण्यात येणार होता त्या ठिकाणाहून वीजपुरवठा करण्यास कोपरगाव तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने खोडा घातला असून या ठीकाणाहून वीज पुरवठा करून देणार नसल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे विधायक कामाला छुपा विरोध करणाऱ्या या नेत्याविरुद्ध नागरिकांमध्ये विशेषत: कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून कोपरगाव बस स्थानकात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या संख्येचा विचार करता महायुती शासनाने कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. या बस चार्जिंग स्टेशनच्या ०२ कोटी ६४ लक्ष ३५ हजार निधीच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. या बस चार्जिंग स्टेशनला कोपरगाव औद्योगिक वसाहतीतून औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिकांच्या वीज पुरवठ्याला कुठलाही धक्का न लावता स्वतंत्र फिडरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येणार होता. त्याबाबत बस डेपो व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यासाठी कोपरगाव बस स्थानक ते कोपरगाव औद्योगिक वसाहती पर्यंत विजेचे पोल देखील उभारण्यास सुरुवात झाली होती.
परंतु नुकतेच एका ज्येष्ठ नेत्याने कोपरगाव बस आगारात उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी कोपरगाव औद्योगिक वसाहतीतून वीज पुरवठा करण्यासाठी विरोध दर्शविला आहे. बस डेपोच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत चांगलेच धारेवर धरत इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन झाले नाही तरी चालेल मात्र कोपरगाव औद्योगिक वसाहतीतून वीज पुरवठा होवू देणार नाही असा पवित्रा घेवून वीज पुरवठ्यासाठी उभे करण्यात आलेले विजेचे पोल देखील उपटून टाकण्यात सांगितले आहे. याबाबत कोपरगाव शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरु असून कोपरगाव शहरातील नागरीकांनी या ज्येष्ठ नेत्याच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
२०२० ते २०२३ च्या कोविड प्रकोपानंतर कोपरगावची बाजारपेठ पुन्हा ऊर्जितावस्थेत येत असून पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यामुळे ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या कोपरगावच्या पावन भूमीत देखील भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. राज्यभरातून कुंभ मेळ्यासाठी नाशिकला येणारे भाविक जातांना व कुंभ मेळाव्यावऋण येतांना जवळच असलेल्या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जातील त्यावेळी कोपरगाव बस स्थानकात मोठ्या प्रमाणात बसची संख्या वाढणार असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील लाखात असणार आहे. त्याचा फायदा कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना निश्चितपणे होणार आहे. या बस चार्जीग स्टेशनला वीजपुरवठा करतांना औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिकांच्या वीज पुरवठ्याला कुठलाही धक्का लागणार नाही हे वस्तुस्थिती आहे. परंतु विधायक कामाला असाच छुपा विरोध होत राहिला तर कोपरगावकरांचे नक्कीच मोठे नुकसान होणार आहे. या ज्येष्ठ नेत्याच्या भूमिकेला राजकीय वास येत असून अशा विधायक कामाला विरोध करणाऱ्या त्या नेत्याच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.