कोपरगाव बस आगारास १५ नवीन एस.टी. बस लवकरच होणार उपलब्ध. मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश - Shramik News

Breaking

Wednesday, May 21, 2025

कोपरगाव बस आगारास १५ नवीन एस.टी. बस लवकरच होणार उपलब्ध. मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश


कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव एस.टी. आगारात बस संख्या कमी असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (MSRTC) नवीन बस (बी एस ६) मागवण्यासाठी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार आणि संबंधित कार्यालयाच्या कार्यवाहीनंतर कोपरगाव आगाराला १५ नवीन प्रकारच्या बसेस टप्प्या टप्प्याने मिळणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.


कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी वर्ग आणि महिला प्रवासी दररोज एस.टी. वाहतुकीवर अवलंबून आहेत. मागील काही वर्षांमध्ये जुनी झालेली वाहने, त्यांच्या सतत बिघाडामुळे होणारा खोळंबा, तसेच प्रवाशांना बस उपलब्ध न होण्यामुळे निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी हा प्रश्न ठामपणे मांडला होता.


या मागणीस अनुसरून रा.प. महामंडळाने आपल्या ताफ्यातून कोपरगाव आगारासाठी १५ नवीन बसेस जशा उपलब्ध होतील त्यानुसार लवकरच देण्याचे निश्चित केले आहे. या बसेस आगारात दाखल झाल्यानंतर कोपरगाव बस आगारातील प्रवासी वर्गाची होणारी अडचण दूर होणार आहे. चालक आणि वाहक यांना देखील वारंवार जुन्या वाहनांच्या अडचणी व अपूर्णता याचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे चांगला निर्णय या माध्यमातून होणार आहे.


स्नेहलताताई कोल्हे यांनी ही मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,रा.प. महामंडळाचे व्यवस्थापक तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले असून, कोपरगावकर प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा व उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले आहे.

 

Pages