कोपरगाव - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे खगोलशास्त्राचा आत्मा हरपला अशा शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे वतीने श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, स्व. जयंत नारळीकर यांना सर्वस्पर्शी ज्ञान होते. नाशिक येथे भरलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. लहान मुलांपासुन ते उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विज्ञान शिकविले. शास्त्रज्ञाबरोबरच त्यांच्यात एक लेखकही दडला होता. यक्षांची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा किताबही मिळाला होता.
अंधश्रध्दा निर्मुलनासाठीही त्यांनी मोठे काम केले. चार नगरातले माझे विश्व त्यांच्या या आत्मचरित्रात त्यांनी जीवनाचा सर्व उलगडा करत खगोलशास्त्राच्या गमती जमती लिहील्या आहेत. त्यांचे वडील रँग्लर विष्णु वासुदेव नारळीकर हे वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती हया संस्कृत शिक्षीका होत्या. आई वडीलांकडुनच त्यांना ज्ञानाचा वारसा मिळाला. टाटा मुलभुत संशोधन संस्थेचे खगोलशास्त्र प्रमुख तर आयुका पुणे संस्थेचे ते संचालक होते. स्थिर स्थिती सिध्दांतावर त्यांनी संशोधन केले.
त्यांच्या निधनाने आपण विज्ञानवादी शास्त्रज्ञाला मुकलो आहोत अशा शब्दात माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.